Monday, February 25, 2019

शिक्षणाने माणूस मोठा होतो



शिक्षणाने माणूस मोठा होतो


सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्हा पिंपरी मेघे या गावी अभिमानजी साठे यांच्या घरी झाला. एक अवांछित बाळ असल्याने त्यांना 'चिंधी' (कपड्याचे फाटलेले तुकडे) टोपणनाव म्हणून ओळखले जात असे. त्यांचे वडील त्यांच्या आईच्या इच्छेविरुद्ध सिंधुताईला शिक्षित करण्यासाठी उत्सुक होते. अभिमानजी त्यांना शाळेत पाठवत असत, जिथे ती 'भारदी वृक्षांची पाने' स्लेट म्हणून वापरली जात होती कारण आर्थिक कारणांमुळे त्यांना वास्तविक दगडी पाटी विकत येत नव्हते. गरीबी, जबाबदाऱ्या आणि प्रारंभिक विवाह यामुळे 4 थ्या वर्गाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना औपचारिक शिक्षणातून बाहेर पडावे लागले.
12 वर्षांची असताना त्यांनी श्रीहरि सपकाळ उर्फ ​​हरबाजी यांच्याशी विवाह केला, ज्यांचे वय सिंधुताईंपेक्षा दुप्पट होते. आणि ते वर्धा जिल्ह्यातील नवरागांव गावातील रहिवाशी होते. सिंधुताई 20 वर्षांची होईपर्यंत त्यांना तीन मुलगे झाले. त्यांनी स्वत: सुवासिक गोमूत्र हे भारतात इंधन म्हणून वापरले जाते आणि जंगलातील हे गोमूत्र विकून त्या उदरनिर्वाह करत परंतु त्यांना त्याचे काही पैसे मिळत नसत म्हणून यासाठी त्यांनी लढा दिला.
त्यांनीआपले संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी समर्पित केले आहे. परिणामी त्यांना 'माई' (आई) म्हटले जाते. आतापर्यंत त्यांनी 1050 अनाथ मुलांचे पालनपोषण केले आहे. आजपर्यंत त्यांचे कुटुंब 207 लोकांचे असून त्या जावयाच्या सासू आहेत. हे प्रेरणादायी मराठी भाषण नक्की बघा आणि आपल्या मित्र परिवारासह शेअर करायला विसरू नका.
जय महाराष्ट्र !



Monday, February 18, 2019

एक वनवासी- सिंधुताई सपकाळ

सिंधूताई सपकाळ हे नाव आपण कधीना कधी ऐकलेच असेल.समाजाला काहीतरी चांगल देण्याची,त्यांना वळण लावण्याची ताकद असणारे अनेक  प्रतिभावंत मराठी मातीत आहेत.प्रश्न आहे तो फक्त त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा.आपल्या कार्याचा ठसा जनमाणसावर उमटवणाऱ्या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमंकाने आणि आदराने घेतले जाते.समाजाने धूडकारलेल्या, स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने,प्रेमाने आपलास करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कोणालाही थक्क करणारी आहे.वैयक्तिक आयुष्यातील दुखाचे डोंगर दूर सारत दुसर्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधूताईचा जीवनपट खरच प्रेरणादाई आहे.
अनाथ मुलाच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला दुसर्या अनाथआश्रमात ठेवणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचा जीवनपट आता चित्रपट रुपात येत आहे.सचिन आणि बिंदिया खानविलकर यांनी 'मी सिंधूताई सपकाळ' या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली आहे. या चित्रपटात ताईच्या जीवनातील  सर्व घटनांचा,चढ- उताराचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जसे लग्नामुळे मधेच सोडावे लागलेले शिक्षण,थंडीपासून रक्षण करण्यासाठी घेतलेल्या चितेच्या आगीचा शेक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी आणण्यात येणाऱ्या पिंडाचा भात खाण्यापासून ते अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडणाऱ्या सिंधूताईची रोमांचित करणारी जीवनयात्रा.या चित्रपटाची कथा सिंधूताईच्या 'मी वनवासी' या पुस्तकावर आधारलेली  आहे.
हा चित्रपट एक जागतिक दर्जाचा ह्वावा अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.या चित्रपटाद्वारे सिंधूताई जनमाणसापर्यंत पोहचतील अशी आशा करूयात.

सिंधूताईना प्रत्यक्ष भेटण्याचा योग फार कमी आला.लहान असताना आमच्या गावात सिंधूताईचा कार्यक्रम होता त्यावेळी त्यांना ऐकण्याचा योग आला होता.बोलताना त्या लोकांना आपलेसे कधी करून घेतात हेच लक्षात येत नाही.आपली अनाथ मुलांसाठीची तग मग मांडताना त्या आजही कवितांचा   आधार घेतात.गदिमा,बहीणाबाई,सुरेश भटांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकताना ऐकणारा तल्लीन झाला नाहीतर नवलच!

सगळ बोलून झाल कि माई लोकांसमोर आपली झोळी फैलावतात आणि अनाथांसाठी काहीतरी मदत करा अशी साद घालतात.'१७० हून अधिक पुरस्कार मिळाले,पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही' म्हणून त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागतात.आश्रमातील सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना त्यांची दमछाक होते.'गाना नाही तो खाना नही,भाषण नही तो राशन नही' असे म्हणत आपल्या मुलांना २ वेळच जेवण मिळव म्हणून त्या आजही महाराष्ट्रभर हिंडत असतात.त्यांची हि परवड कधी संपणार परमेश्वरालाच माहिती.

आम्ही फेसबुक वरील एका समूहातील काही सभासदांनी मिळून काहीतरी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने एक मोहीम राबविली होती. तसेच आपण सर्व मराठी ब्लॉगर  मिळून सिंधुताई साठी काही करू शकतो का ? जास्त नाही एकाने  ५००-१००० जरी जमा केले तरी चालतील तेही नाही  जमले तरी १००-२०० तरी देऊ शकतोच कि. बघा पटतंय का ते प्रतिसाद द्या प्रत्यक्षात  आणू आपण हे, मी वाट पाहत आहे.

कोणाला जरी सरळ आश्रमात जाऊन मदद करायची असेल तरी ते तसे करू शकतात.पुण्यापासून जवळ आहे.

आश्रमाचा पत्ता:
सन्मती बाल निकेतन
बेल्हेकर वस्ती, मंगल एंटरप्रायजेस शेजारी,
वसंतदादा साखर कारखान्याजवळ, मांजरी बु.,
पुने - ४१२ ३०७

सिंधुताईचा  पत्ता -
सन्मती बाल निकेतन संस्था,
मिनाक्षी बिल्डींग, दुसरा मजला, विहार चौक,
तुपे आळी, हडपसर,
पुणे - २८
फोन नं - ०२० - २६८७०४०३

Sunday, February 10, 2019

सिंधुताईचा जीवनप्रवास

जन्म व बालपण

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर इ.स. १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरचे गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आले.

विवाह

सिंधुताईंचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला . घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.

जीवनातील संघर्ष

दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार मग सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.

ममता बाल सदन

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली.  आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले  आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही  त्यांना मार्गदर्शन दिले जाते.आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत. 
सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे-
  • बाल निकेतन हडपसर ,पुणे
  • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह ,  चिखलदरा
  • अभिमान बाल भवन , वर्धा *
  • गोपिका गाईरक्षण केंद्र , वर्धा ( गोपालन) 

आंतरराष्ट्रीय पातळीवर

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.

पुरस्कार व गौरव

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही :-
  • पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (२०१२).
  • २०१० - स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
  • मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
  • आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
  • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
  • राजाई पुरस्कार.
  • शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
  • श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार १९९२.
  • सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला रिअल हीरो पुरस्कार (२०१२).
  • २००८ - दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५) 
  • डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)

प्रसारमाध्यमांतील चित्रण

  • सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
  • सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.

Monday, February 4, 2019

थोडक्यात माहिती

सिंधुताई सपकाळ 

(जन्म: १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; वर्धामहाराष्ट्र - हयात)

या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.